आज संपूर्ण जगाला दहशतवादी कारवायांचा सामना करावा लागत आहे. सर्वच देशांच्या प्रगतीला दहशतवाद नावाचा गंज लागला आहे. काही ठराविक देश किंवा संघटना या जगातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असून ते नेहमी निसर्गाच्या विरुद्ध बाजूने विचार करत असताना दिसतात. परंतु निसर्गाच्या आणि नेहमी शांतता बाळगणारा आपल्या देशावर आज पर्यंत अनेक दहशतवादी कारवायांना सामोरे जाऊन त्यावर विजय प्राप्त केला आहे आणि या विजयामध्ये पोलीस, भारतीय लष्कर आणि सामान्य नागरिक याचा खूप महत्वाचा वाट असतो. लेखक अभिषेक ज्ञानेश्वर ठमके लिखित ‘टेरर अॅटॅक अॅट डोंबिवली स्टेशन’ हे पुस्तक मोठ्यातला मोठा दहशतवादी हल्ल्याला कशा प्रकारे सामोरे जाऊन त्यावर विजय मिळवता येईल हे सांगत आहे. या विजयामध्ये सामान्य नागरिक तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग उत्तम प्रकारे केल्यास त्याचा मानवाचा जीव वाचवण्यासाठी मदत होते याची प्रचीती देणारे आहे.
‘टेरर अॅटॅक अॅट डोंबिवली स्टेशन’ या पुस्तकात लेखक अभिषेक ठमके यांनी १५ ऑगस्ट रोजी मुंबई मधील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्याचे वर्णन घेतले आहे. अतिशय कमी शब्दामध्ये उत्कृष्ट लेखन केले आहे. एखाद्या देशावर हल्ला करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची आखणी केली जाते. दहशतवादी कसे निवडले जातात. काम पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मनामध्ये कशा प्रकारचे विचार पेरले जातात आणि त्याचा त्यांच्यावरती कसा परिणाम होतो. हे लेखकाने सांगितले आहे. भारतासारख्या देशावर हल्ला करण्यासाठी आलेल्या दहशतवादी आणि त्यांना प्रतिउत्तर देताना पोलिसांनी केलेली आखणी खूप महत्वाची असते. दहशतवादी भारतामध्ये कसे येतात त्यानंतर पोलीस त्यांना कसे नजर कैदेत ठेवतात आणि पुढे झालेल्या चकमकीचे लेखकाने रोमांचिक वर्णन केले आहे.
सामान्य नागरिक १५ ऑगस्ट रोजी राष्ट्र ध्वजाला वंदन करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. डोंबिवली स्टेशनवरून वर्षानुवर्षे प्रवास करणाऱ्या व्यक्ती नेहमी प्रमाणे प्रवास करत आहेत आणि अचानक दहशतवादी हल्ला झाल्याने सर्वाची झालेली धावपळ त्याचा बरोबर आपल्या जवळच्या व्यक्तीचा झालेला मृत्यू या सर्व गोष्टी विसरून दहशतवाद्याना ठार मारण्याची सामान्य नागरिकाची भावना लेखकाने खूप छान पद्धतीने सांगितली आहे. हे पुस्तक वाचत असताना प्रत्येकाला पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यातील धाडस पाहून अभिमान नक्की वाढेल. संपूर्ण जगाच्या नजरेसमोर भारत हा बलवान आणि शौर्याचा देश म्हणून नक्कीच उभा राहील. ‘टेरर अॅटॅक अॅट डोंबिवली स्टेशन’ हे पुस्तक नक्कीच येणाऱ्या नवीन पिढीला प्रेरणा देणारे ठरेल.
अभिषेक ठमके यांचे ई-साहित्य क्षेत्रात आजवर अनेक साहित्य प्रकाशित झाले आहेत. त्यापैकी ३ कादंबऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अँड्रॉइड ऍप क्षेत्रात देखील भरीव कामगिरी करत प्रकाशित सर्व साहित्य उत्तम रेटिंगनुसार आंतरराष्ट्रीय गुगल ऍप यादीमध्ये पहिल्या १०० साहित्यामध्ये समाविष्ट झाले आहेत.Wettapad या इंग्रजी साहित्याची मक्तेदारी असणाऱ्या लायब्ररीमध्ये मराठी साहित्य (पुन्हा नव्याने सुरुवात) सलग दोन महिने पहिल्या २० साहित्यांमध्ये होते. कवितासागर प्रकाशनाद्वारे त्यांची ‘पुन्हा नव्याने सुरुवात’ ही कादंबरी एकाच वेळी १२ संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली. तरुण मराठी वाचक मराठी साहित्याकडे आकर्षित व्हावा यासाठी प्रत्येक कादंबरी प्रकाशित होण्याआधी ट्रेलर प्रकाशित करण्यात ते यशस्वी झाले. सोशल मिडीयावर अल्पावधीत लोकप्रिय झालेले मराठीतील लेखक त्यांच्या ई-दिवाळी अंकासाठी देखील तेवढेच लोकप्रिय आहेत. जगभरातील लेखकांचे साहित्य समाविष्ट करून आपला ई-दिवाळी अंक ६३ देशांमध्ये पोहोचवून परदेशातील मराठी वाचकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात ते यशस्वी ठरले. आरंभ या मराठीतील वेगळ्याच ई-मासिकाद्वारे वाचकांचा कल ई-साहित्याकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अँड्रॉइड ऍप आणि ई-पुस्तक स्वरुपात त्यांचे ई-मासिक उपलब्ध होत आहे.
लेखनशैली: अभिषेक ठमके हे मराठीतील साय-फाय लेखक या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. वैज्ञानिक दाखले देत त्यांनी आपल्या अनेक साय-फाय प्रकारातील मराठीतील दुर्मिळ कादंबऱ्या प्रकाशित केल्या आहेत. कादंबरीच्या कथेला विज्ञानाचा संदर्भ असल्याने विशेषतः तरुण वाचकांचा कादंबरी वाचण्याचा कल वाढत आहे. त्यांच्या प्रत्येक पुस्तकांमधून वाचकांना काही ना काही शिकता यावे यासाठी वर्षभर त्या विषयावर अभ्यास करून / प्रस्तुत विषयांशी संबंधित व्यक्तींना भेटून ते संशोधन करतात आणि वाचकांना सोप्या भाषेत विज्ञानाचे दाखले देत कादंबरी लेखन करतात. त्यांची पुस्तकं मुख्यतः वैज्ञानिक, लष्कर, पोलीस आणि संशोधकांवर आधारित असतात.
मराठी साहित्यातील प्रयोग: संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये मराठी साहित्यिकांचे योगदान मोलाचे होते, त्या साहित्यीकांना श्रद्धांजली म्हणून दरवर्षी १ मे रोजी ते आपले पुस्तक प्रकाशित करतात. त्यांच्या ‘मैत्र जीवांचे’ या कादंबरीने गुगल प्ले स्टोरवर १,००,००० वाचकांचा टप्पा ओलांडला होता. मराठी वाचकांना ब्लॉगलेखन करता यावे यासाठी त्यांनी आपले दुसरे पुस्तक अग्निपुत्र विविध भागांमध्ये ब्लॉगवर प्रकाशित केले, ज्यामध्ये त्यांच्या ब्लॉगला कादंबरी पूर्ण होण्याआधीच ४,००,००० पेक्षा जास्त वाचक लाभले. पुन्हा नव्याने सुरुवात ही कादंबरी त्यांनी एकाच वेळी १२ संकेतस्थळांवर प्रकाशित केली. मराठीतील थोर विचारवंतांची माहिती तरुण पिढीला व्हावी यासाठी ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ हे अँड्रॉइड ऍप प्रकाशित केले, जे गुगल प्ले स्टोरवर आजदेखील उत्तम रेटिंगनुसार उपलब्ध आहे. योगासनांविषयी ई-साहित्य क्षेत्रात मराठीमध्ये पहिले अँड्रॉइड ऍप प्रकाशित केले. मराठीतील नवोदित लेखकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत सर्वसमावेशक अर्थ मराठी ई-दिवाळी अंक आणि आरंभ ई-मासिक सुरु केले.