माझी मागील पुस्तके ही सैनिक, वैज्ञानिक आणि पोलिसांवर आधारित होती. हे पुस्तक देखील त्यांच्यावरच आधारित आहे. इथे गोष्ट ‘ओमेगा’ नावाच्या एका रोबोची आहे.
आपल्यापैकी प्रत्येकाकडे कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचे विशेष ज्ञान आहे. जसे कोणी उत्तम चित्रकार आहे, तर कोणी चांगल्या प्रकारे नृत्य करतो. कोणी बुद्धीने तरबेज असतो तर कोणी अंगकाठीने दणकट असतो. बऱ्याचदा आपण कळत किंवा नकळत आपल्याकडे असलेल्या वैशिष्ट्याचा गैरवापर एखाद्याला कमीपणा दाखवण्यासाठी किंवा अपमानीत करण्यासाठी करतो. प्रत्येकजण कधी ना कधीतरी असे वागतोच. मग समोरची व्यक्ती आपल्यापुढे आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या कमकुवत असते. आपण तिच्या याच गोष्टीचा वापर करून आपले हेतू साध्य करतो. तेव्हा आपल्याला जो आनंद मिळतो, किंवा जो काही अनुभव आपल्याला येतो, तो फक्त आपल्यासाठी क्षणापुरता असतो. पण समोर असलेल्या व्यक्तीच्या मनात तो खोलवर रुजतो. बऱ्याचदा त्या घटनेने त्याचे किंवा तिचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. आपल्याला त्यांच्याशी काही घेणे देणे नसते. पण कधी ना कधी तरी ती घटना आपल्यासोबत घडते. तेव्हा आपण कमकुवत असतो आणि समोरची व्यक्ती सामर्थ्यवान. चक्र असेच फिरते. ‘ओमेगा अपग्रेडेड’मध्ये आपल्याला असेच काही वाचायला मिळणार आहे.
एक संशोधक नक्की काय करू शकतो, संशोधन करण्यामागे त्याची मानसिकता काय असते, हे आपल्याला या पुस्तकामध्ये वाचता येईल. या विषयावर लिहिण्यासाठी २०१३ पासून प्रयत्न चालू होते, पण कथा पुढे जात नव्हती. तर दुसरीकडे ‘पुन्हा नव्याने सुरुवात’, ‘अग्निपुत्र’, ‘टेरर ऍटॅक ऍट डोंबिवली स्टेशन’ या कादंबऱ्या येऊन गेल्या देखील. सोबतच Ransomware नावाचा व्हायरस देखील आला, ज्या प्रकारच्या व्हायरसचा उल्लेख या पुस्तकामध्ये केला गेला आहे. आपण मागे पडलो आहोत अशी भावना तेव्हा मनात आली होती. पण कथेला सशक्त रूप येत नसल्याने पुढे जाणे शक्य होत नव्हते. मग पुन्हा ही कादंबरी लिहायला घेतली. सोबतच मिस्टर सिंगल फादर कादंबरीचे काम देखील चालूच होते. पण ती कादंबरी देखील पूर्ण करता आली नाही, कारण बऱ्याच वर्षांपासून रखडलेली ही कादंबरी नजरेतून हटत नव्हती. बराच विचार केल्यानंतर काहीही झाले तरी ही कादंबरी पूर्ण करायचीच, असे ठरवले. गोष्ट नव्याने लिहायला घेतली. पुन्हा संदर्भ गोळा केले, पुन्हा जाणकारांसोबत चर्चा केली, गोष्टीला हळूहळू रूप मिळू लागले, आणि सहा वर्षांनी ही कादंबरी पूर्ण करता आली.
या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकाला नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तक न आवडल्यास मला आपले मत कळवा, पुस्तक आवडल्यास इतरांना नक्की कळवा. मराठी वाचकांमध्ये माझ्या पुस्तकांच्या माध्यमातून विज्ञानाबाबत गोडी वाढल्यास मला पोचपावती मिळाली असे मी समजेन.
लोभ असावा.अभिषेक ठमके यांचे ई-साहित्य क्षेत्रात आजवर अनेक साहित्य प्रकाशित झाले आहेत. त्यापैकी ३ कादंबऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अँड्रॉइड ऍप क्षेत्रात देखील भरीव कामगिरी करत प्रकाशित सर्व साहित्य उत्तम रेटिंगनुसार आंतरराष्ट्रीय गुगल ऍप यादीमध्ये पहिल्या १०० साहित्यामध्ये समाविष्ट झाले आहेत. Wettapad या इंग्रजी साहित्याची मक्तेदारी असणाऱ्या लायब्ररीमध्ये मराठी साहित्य (पुन्हा नव्याने सुरुवात) सलग दोन महिने पहिल्या २० साहित्यांमध्ये होते. कवितासागर प्रकाशनाद्वारे त्यांची ‘पुन्हा नव्याने सुरुवात’ ही कादंबरी एकाच वेळी १२ संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली. तरुण मराठी वाचक मराठी साहित्याकडे आकर्षित व्हावा यासाठी प्रत्येक कादंबरी प्रकाशित होण्याआधी ट्रेलर प्रकाशित करण्यात ते यशस्वी झाले. सोशल मिडीयावर अल्पावधीत लोकप्रिय झालेले मराठीतील लेखक त्यांच्या ई-दिवाळी अंकासाठी देखील तेवढेच लोकप्रिय आहेत. जगभरातील लेखकांचे साहित्य समाविष्ट करून आपला ई-दिवाळी अंक ६३ देशांमध्ये पोहोचवून परदेशातील मराठी वाचकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात ते यशस्वी ठरले. आरंभ या मराठीतील वेगळ्याच ई-मासिकाद्वारे वाचकांचा कल ई-साहित्याकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अँड्रॉइड ऍप आणि ई-पुस्तक स्वरुपात त्यांचे ई-मासिक उपलब्ध होत आहे.