"माणसाला दोन मनं असतात, बाळासाहेब! एक पशूचं आणि एक देवाचं. पहिलं मन उपभोगात रमून जातं, दुसरं त्यागात आनंद मानतं! पहिल्याला शरीराच्या सुखापलीकडे काहीच दिसत नाही. दुसर्याला त्याच्यापलीकडे असणार्या उदात्ततेचा साक्षात्कार होतो. या दोन मनांतल्या पहिल्याला निसर्गानं आपलं सारं सामथ्र्य दिलं आहे. दुसरं त्या मानानं फार दुबळं असतं. या दुसर्या मनाचं बळ वाढवणं, दोन्ही मनांचं बळ सारखं करून जीवन सुखानं जगणं आणि जगता जगता त्याचा विकास करणं, हे यशस्वी आयुष्याचं खरं लक्षण आहे. पण मनुष्याच्या आयुष्यात या दोन मनांचा झगडा नेहमीच सुरूअसतो. या झगड्यात ज्यांचं दुसरं मन विजयी होतं, ते कुठल्याही संकटाला हसत तोंड देतात. पण पहिल्या मनाच्या आहारी गेलेला माणूस दुबळा होत जातो, मोहांना बळी पडतो, जिवलग माणसांशीही प्रतारणा करूलागतो, आणि मग...''