हिटलरने लक्षावधी लोकांना धाकात ठेवले. त्याच्यासाठी लक्षावधी लोकांनी प्राण दिले आणि लक्षावधी लोक त्याच्याशी लढून मेले. आज जर्मनीमधल्या शाळकरी मुलांना हिटलरविषयी प्रश्न विचारले, तर त्यांना फार थोडे माहीत आहे, असे दिसून येते. हिटलरच्या अनुयायांची तर नावेसुद्धा मुलांना माहीत नाहीत. मानवी ध्येयाने लोक लवकर उस्फुर्त होतात, पण तितक्याच लवकर ही ध्येये विसरतात. आपण नाश केला नाही, तर निसर्ग चिरंतन आहे! आज ज्या परिषदेच्या बातम्यांनी वृत्तपत्रे भरून गेली आहेत, त्या परिषदेसंबंधी आणखी पन्नास वर्षांनी कुणाला काही सोयरसुतक राहणार नाही; पण आणखी पन्नास वर्षांनी मावळत्या सूर्याने लालेलाल केलेल्या आभाळाच्या पाश्र्वभूमीवर उभा राहून एखादा सिंह गर्जना करेल, तेव्हा ऐकणारा थरारून जाईल. मग तो डोमोक्रॅट असो, बोल्शोव्हिक असो, इंग्लिश, जर्मन, रशियन, खाहिली कोणतीही भाषा बोलणारा असो. आणखी पन्नास वर्षांनी, शंभर-दोनशे वर्षांनीसुद्धा कुरणावर दिसणाऱ्या ह्या सिंहांसाठी, झेब्य्रांसाठी आज काही कष्ट करणे, हा खरोखरीच वेडेपणा ठरेल का?