आजचं युग हे विज्ञानयुग आहे. विज्ञानाची घोडदौड सर्व क्षेत्रांमध्ये चालू आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपलं जीवन दिवसेंदिवस अधिकाधिक सुखकर, आरामदायी, वेदनारहित होत आहे. असं असलं तरी अजूनही कित्येक गोष्टी अशा आहेत, की ज्यांचं स्पष्टीकरण आजच्या विज्ञानाला देता येत नाही. असं स्पष्टीकरण कदाचित उद्या मिळेल. पण आज तरी त्यांच्याभोवती गूढतेचं धुकं आहे. या धुक्यात दडलेल्या सत्याचं स्पष्ट आणि वास्तव दर्शन होत नाही आणि त्यामुळे त्याविषयी अनेक प्रकारचे समज आणि गैरसमज निर्माण होतात. गूढ आणि विलक्षण गोष्टींचं माणसाला नेहमीच आकर्षण असतं. असं असेल का, असं खरंच घडेल का अशा विचारांनी तो भारला जातो. अशा काही भारणाऱ्या कथांचा हा संग्रह. शुभदा गोगटे या विज्ञानकथा लेखिका म्हणून सुपरिचित आहेत. त्यांच्या विज्ञानकथांप्रमाणेच या गूढ कथा वाचकाला खिळवून ठेवतात.