मला वाटतं कुणीच एक दुसऱ्या पुस्तकाने लेखक होत नाही. प्रत्येक कला निपजते ती ध्यासातून...व्यावसायिक समाजसेवेची पदवी घेऊन शिक्षणाच्या क्षेत्रात काम करताना मला आलेल्या अनुभवाने, त्यावर झालेल्या चिंतनाने मला लिहिण्यास भाग पाडले असं मी म्हणेन. आयुष्य जगताना आपण जे वागतो ते सारं समाजमान्यतेच्या चौकटीत बसवणं कधीकधी कठीण असतं. मात्र तेच समाजाने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करून मनासारखं वागणं प्रत्येकालाच शक्य नसतं. असं असताना माणसाचं मन एकीकडे आणि हृदय दुसरीकडे धाव घेतं. त्याचाच ताळमेळ बसवण्यासाठी मग माणूस एक सुवर्णमध्य स्वीकारतो. अवनी ही अशाच सुवर्णमध्य साधू इच्छिणाऱ्या पात्राची गोष्ट. माझ्या नजरेतून पाहिलं तर अशा कित्येक अवनी आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांना समजून उमजून घेण्याचा मी केलेला हा छोटासा प्रयत्न.