‘ती सकाळ अशीच ताजी अन् टवटवीत होती. माझी गाडी सॉल्ट फोर्वâच्या दिशेने वेगाने धावत होती. आकाशात शुक्राची चांदणी ऐन तेजाने तळपत होती. रात्रीच्या आणि पहाटेच्या मधल्या त्या संधिकाळाच्या वातावरणात अतिसुंदर हिरवट-निळसर छटा पसरली होती. थोड्या वेळाने त्या छटेतून मृदू जांभळा प्रकाश सर्वत्र पाझरू लागला. थंड पहाटवारा वाहू लागला. मद्यापेक्षाही अधिक उत्तेजक अशा त्या शीतल झुळका मी जणू घोटाघोटाने पीत होतो.’