...कथाबीजं दाही दिशांनी मनात येऊन पडतात-- प्रत्यक्ष अनुभवलेल्या एखाद्या भावनेच्या छटेपासून ती सहजगत्या कानांवर पडलेल्या एखाद्या चार-दोन ओळींच्या घटनेपर्यंत अशा अनेक अनुभवांत कथाबीजं लपलेली असतात; पण ती सारीच फुलवण्याचं सामथ्र्य पुष्कळांच्या अंगी नसतं. झोपलेलं माणूस एकदम काही तरी टोचल्यामुळं जागं व्हावं, त्याप्रमाणं ज्या अनुभूतीनं संवेदना सचेतन होते आणि कल्पना, भावना आणि विचार यांच्या त्रिवेणी संगमानं न्हाऊ लागते, तीच पुढं स्वत:ला हवं तसं कथारूप धारण करूशकते. अशा रीतीनं गेली पन्नास वर्ष मी कथापंढरीचा वारकरी राहिलो आहे. पहिल्या दहा-वीस वर्षात मी तरुण वारकरी होतो. चालण्यात काय किंवा अभंग आळवण्यात काय, माझ्या ठिकाणी दुर्दम्य उत्साह होता. आता त्या उत्साहाची अपेक्षा करणं सृष्टिक्रमाला धरून होणार नाही. तथापि, गेल्या काही वषा|त ज्यांचा कथारूपानं माझ्या हातून आविष्कार झाला, असे काही अनुभव या संग्रहात प्रतिबिंबित झाले आहेत. या संग्रहातील कथांनी कुणाचं थोडं सात्त्विक रंजन केलं, कुणाला थोडा वाङ्मयीन आनंद दिला, एखाद्याला त्यात दिलासा सापडला, तर त्या लिहिताना मला जो आनंद झाला, तो केवळ वौयक्तिक नव्हता, या जाणिवेनं माझं लेखन सफल झालं, असं मी मानेन.'