‘बेंजामिन फ्रँकलिन अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे एकमेव
असे राष्ट्रपती होते, जे कधीही अमेरिकेचे राष्ट्रपती नव्हते.’
वरील विधान बेंजामिन फ्रँकलिन यांच्याबाबत केलं जातं. आज देशभरात त्यांचे शेकडो पुतळे उभारले गेले आहेत, यावरूनच त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्य समजू शकतं. अमेरिकन डॉलर, विविध पदकं आणि पोस्टाची तिकिटं अशा वस्तूंवरही बेंजामिन यांची प्रतिमा छापली जात आहे. अमेरिकेतील कितीतरी पूल, शाळा, महाविद्यालयं, हॉस्पिटल्स आणि संग्रहालयं यांनादेखील बेंजामिन यांचं नाव देण्यात आलं. कारण बेंजामिन यांनी जीवनात पैशांपेक्षाही जास्त लोकांचे आशीर्वाद प्राप्त केले. लोकांच्या आनंदातच त्यांचा आनंद सामावलेला होता. आयुष्यात उगाचंच एखाद्याची इतकी प्रसिद्धी होत नाही.
बेंजामिन फ्रँकलिन यांनी दृढ संकल्प आणि नैतिकता या गुणांच्या आधारे मनुष्याची अवस्था कशीही असली, तरी तो मानवजातीसाठी महान कार्य करू शकतो, हे सिद्ध केलं. त्यांच्या चारित्र्यातील या वैशिष्ट्यामुळेच त्यांना ‘अमेरिकेचे जनक’ मानलं जातं. प्रस्तुत पुस्तकात बेंजामिन फ्रँकलिन यांच्या जीवनातील कित्येक प्रेरणादायी घटनांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. साधारण प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणारा एक सामान्य मुलगा, स्वतःच्या गुणांचा विकास करून जनसामान्यांसाठी निमित्त बनतो आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचा जनक मानला जातो! हा त्यांचा जीवनप्रवास निश्चितच थक्क करणारा आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, यासाठीच या पुस्तकाच्या माध्यमातून या बहुआयामी व्यक्तीचं जीवनचरित्र आपल्यासमोर सादर करताना अतिशय आनंद होत आहे.